हायलाइट्स:

  • आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीबाबत पुण्यात बैठक.
  • वारीबाबत अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतच होणार.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती.

पुणे: आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीला परवानगी द्यायची की नाही याबाबत मंत्रिमंडळात चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. दरम्यान, गेल्यावर्षी कोविड स्थितीमुळे आषाढी वारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यंदा वारी होणार की नाही, याकडे वारकऱ्यांचे डोळे लागले असून आजतरी या प्रश्नाचे उत्तर मिळू शकलेले नाही. ( Ashadi Wari 2021 Latest News )

वाचा: मी योग्य दिशेने चाललोय!; मुख्यमंत्री भेटीनंतर संभाजीराजेंचे सूचक वक्तव्य

आषाढीबाबत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘आजच्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वारीला परवानगी द्यावी, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. मात्र, वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या पाहता याबाबत कोणता निर्णय घ्यायचा, हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून ठरविण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय जाहीर करतील.’

आषाढी वारीची पंरपरा जपण्यासाठी…

करोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील करोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज जाणून घेण्यात आली आहेत, वेळप्रसंगी अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीला शेकडो वर्षांची पंरपरा आहे, मात्र राज्यात करोनाचे संकट आहे, कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आपण सर्व धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. आषाढी वारीची पंरपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी मांडलेली भूमिका मंत्रिमंडळाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. गेल्यावर्षी राज्य सरकारच्या आवाहनाला वारकरी सांप्रदायाने चांगला प्रतिसाद दिला, ही कौतुकास्पद बाब असल्याचेही अजित पवार म्हणाले.

वाचा: पुण्यातील लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय; राजेश टोपेंकडून घोषणा

जीएसटी परिषदेची ४३ वी परिषद ऑनलाइन सुरू आहे. त्या बैठकीत करण्यात आलेल्या मागण्यांविषयी पवार म्हणाले, ‘करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवरील कर कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये पीपीई किट, ऑक्सिजन, इंजेक्शन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या वस्तूंवर सुमारे १२ते २८ टक्क्यांपर्यंत कर आहे’

चंद्रकांत पाटलांची उडवली खिल्ली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. याबाबत विचारणा करण्यात आली असता अजित
पवार म्हणाले, ‘मी, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हेदेखील मराठा समाजाचे आहोत. त्यामुळे आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल.’

वाचा: राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढणार?; राजेश टोपेंचे संकेत



Source link