‘विहिंप’च्या पुणे शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील निवदेन देण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात सरकारकडून होणाऱ्या दडपशाहीचा निषेध जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टाळ वाजवून करण्यात आला. या वेळी ‘विहिंप’चे तुषार कुलकर्णी, आशिष कांटे, अनंत शिंदे, प्रतीक गोरे, विनायक पारेली; तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, ‘देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत आहे. हॉटेल, मॉल, मद्याची दुकाने, बाजारपेठा, लग्न समारंभ, सरकारी कार्यक्रम सर्रास होत आहेत. मात्र, करोनाचे नियम पाळून जे वारकरी पंढरीच्या वाटेवर चालले आहेत, ज्यांच्या मानाच्या दिंड्या आहेत, त्यातील किमान अकरा वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश द्यावा आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्याची संधी मिळावी, अशी मागणी परिषदेने केली आहे.’
‘सरकार अस्मानी संकटाचा फायदा घेऊन पोलिस बळाचा वापर करून वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक सुलतानी अत्याचार करीत आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक, भर रस्त्यात वारकऱ्यांना त्यांचे पारंपरिक गणवेश उतरवायला लावण्याच्या वागणुकीबद्दल मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागावी आणि त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी परिषदेची अपेक्षा आहे,’ असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
Recent Comments