पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत जाहीर सभा घेतली होती. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला यश मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाल्यानंतर आज करण्यात आलेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या आहेत.दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षानुवर्ष राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील गटाने बरोबरी करण्यात यश मिळवल्याने राष्ट्रवादीसाठी हा धक्का समजला जात आहे. यंदाच्या निवडणुकीत राहुल कुल यांनी जनसेवा विकास पॅनलच्या माध्यमातून आपली संपूर्ण ताकद झोकून दिली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचं आव्हान होतं. गेल्या अनेक वर्षांत दौंड बाजार समितीवर राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व होतं. मात्र यंदा आमदार कुल यांनी आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. याचाच परिणाम निवडणूक निकालातही पाहायला मिळाला.

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, भुसावळ बाजार समिती निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या पॅनलचा विजय

नगरमध्ये थोरातच जोरात! विखेंचा होमग्राऊण्डवर धुव्वा, उमेदवाराला अवघं एक मत

सुरुवातीला राहुल कुल यांच्या पॅनेलच्या आठ तर राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर ही लढत आणखी चुरशीची झाली आणि अखेरचा निकाल हाती आला तेव्हा १८ पैकी दोन्ही पॅनेलला प्रत्येकी नऊ जागा आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळाल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीच्या पॅनेललाही समसमान जागा मिळाल्याने तालुक्यातील बाजार समितीच्या सभापतीपदी कोण विराजमान होणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेली ही निवडणुकीत चुरशीची ठरल्याने आगामी काळातील निवडणुकाही रंगतदार होणार, हे स्पष्ट झालं आहे.



Source link