‘लोन ॲप’वरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा खून केला; तसेच चोरलेले दागिने विकून कर्ज फेडले. दुसऱ्या घटनेत ‘लोन अॅप’द्वारे घेतलेल्या कर्जानंतर बदनामीच्या भीतीने तरुणाने आत्महत्या केली. या दोन भयंकर घटना मागील वर्षी घडल्यानंतर ‘लोन अॅप’चा विद्रूप चेहरा समोर आला. ‘लोन अॅप’च्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन सायबर पोलिसांनी राज्यातील; तसेच राज्याबाहेरील काही कॉल सेंटर उद्ध्वस्त केली. हे गुन्हे प्रामुख्याने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड अशा राज्यांतून घडवले जातात. या राज्यांमध्ये सायबर पोलिस पथकांची कमतरता असल्याने या टोळ्या देशभरात धुमाकूळ घालत आहेत.
बंदीचा प्रस्ताव तयार
‘लोनअॅप’द्वारे फसवणूक आणि बदनामीचे प्रकार वाढल्याने; तसेच ‘लोनअॅप’मुळे आत्महत्या आणि खुनासारखे गंभीर घडत असल्याने ‘लोन अॅप’वर बंदी घालण्याचा प्रस्ताव सायबर पोलिसांच्या वतीने तयार करण्यात आला आहे. ‘प्ले स्टोअर’वरील ‘लोन अॅप’बाबत तक्रार आल्यानंतर गुगल कंपनीला माहिती कळवून ही ॲप काढून टाकण्यात येणार आहेत.
आर्थिक अडचणीवेळी ‘लोन अॅप’चा वापर टाळणे आवश्यक आहे. अशा अॅपच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे.
– मीनल पाटील, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
‘थोड्या पैशांसाठी दलदलीत अडकलो’
पैशांच्या गरजेपोटी विजयने (बदलेले नाव) लोन अॅपद्वारे पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले. प्रत्यक्षात साडेतीन हजार रुपये मिळाले. ‘सहा दिवसांच्या मुदतीच्या आधीच पैसे परत करण्यासाठी तगादा सुरू झाला. पाच हजार रुपये वेळेत जमा केले. त्यानंतरही फोनमधील संपर्क क्रमांकांच्या व्हॉट्सअॅपवर छायाचित्र आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला. कर्ज फेडल्याने आपोआप नवीन कर्ज मंजूर झाले. ही रक्कम सुमारे पाच लाखांपर्यंत वाढत गेली. महिनाभर सतत धमक्या आणि बदनामी असा मानसिक त्रास सुरू होता. थोड्या पैशांसाठी मी दलदलीत अडकलो होतो,’ असा अनुभव विजयने सांगितला.
Recent Comments