महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट तेवीस गावांतील बोगस कर्मचारी भरती प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, येत्या आठवड्यात हजारो पानांचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे.
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट तेवीस गावांतील बोगस कर्मचारी भरती प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, येत्या आठवड्यात हजारो पानांचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे. या अहवालातून अनेकांचे बिंग फुटण्याची शक्यता असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. बोगस भरती प्रकरणाची चौकशी बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मंत्रालयापर्यंत धडक मारून चौकशी बंद करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे प्रयत्न निष्फळ ठरल्याने चौकशी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली. पुणे महापालिकेची हद्दवाढ झाली; त्या वेळी शहरानजीकच्या २३ गावांचा समाविष्ट करण्यात आला. गावांचा समावेश पालिकेत होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये शिपाई ते कारकून पदांच्या भरतीचे पेव फुटले आणि घोडेबाजारालाही ऊत आला. बेमालूमपणे राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेचे बिंग महापालिकेत दफ्तर गेल्यानंतर आणि नव्या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यानंतर फुटले. सुमारे बाराशे जागांसाठी भरती झाल्याचे सांगण्यात येते. पैकी चारशे ते साडेचारशे जणांची भरती नियमित असल्याची चर्चा आहे. उर्वरित सातशे जणांची भरती बोगस असल्याचा अंदाज आहे. भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याने, पदाधिकाऱ्याने पुढाकार घेतला, त्यांना कुणी मदत केली, भरती प्रक्रिया कागदावर घडली की प्रत्यक्षात हे लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात हा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन, सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : the bogus recruitment report will come out this week
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Recent Comments