दिवाळीतील फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते, असे सातत्याने सांगितले जाते. प्रत्यक्षात हे ध्वनिप्रदूषण कसे होते, ही माहिती सर्वसामान्यांना कळावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (एमपीसीबी) राज्यातील बहुतांशी शहरांमध्ये दिवाळीपूर्वी काही दिवस ‘फायर क्रॅकर टेस्टिंग’ हा उपक्रम राबवला जातो. यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून नव्याने विक्रीसाठी आलेला प्रत्येक फटाका मैदानावर उडवला जातो. फटाका उडल्यावर झालेला आवाज मापकाच्या साह्याने मोजला जातो. ही माहिती ‘एमपीसीबी’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते.
पुण्यात यंदाची चाचणी विश्रांतवाडी येथील मैदानावर घेण्यात आली. या वेळी अनिल फायरवर्क्स, शिवकाशी अनिल फायर वर्क्स , रेखा फायरवर्क्स, महालक्ष्मी इंडस्ट्रीज, अनिल मोटो शिवकाशी, श्रीशुभलक्ष्मी फायरवर्क्स, रमाना फायरवर्क्स अशा विविध कंपन्यांच्या पंधरा प्रकारच्या फटाक्यांची चाचणी करण्यात आली. फटाक्यांच्या आवाजाचा अहवाल मंडळाने तयार केला आहे.
फायर क्रॅकर टेस्टिंग हा जनजागृतीपर उपक्रम आहे. सर्वसामान्यांना आपण उडवत असलेल्या प्रत्येक फटाक्यांतून सर्वसाधारणपणे किती डेबिसल आवाजाची निर्मिती होते, याची माहिती या उपक्रमातून मिळते. कोणत्या प्रकारातील फटाके जास्त उडवले गेल्यास ध्वनिप्रदूषण वाढू शकते आणि कमी केल्यास प्रदूषणात घट होते, याची माहिती चाचणीतून मिळते, असे ‘एमपीसीबी’चे उपविभागीय अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.
वेष्टणावर माहिती नाही
फटाक्यांच्या आवाजाबरोबरच अधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या बॉक्सवर, पाकिटावर लिहिलेल्या माहितीच्या नोंदीही घेतल्या आहेत. मात्र कोणत्याही फटाक्यांवर ‘नॉइज लेव्हल लिमिट’ दिसले नाही. फटाके बनविण्यासाठी वापरलेल्या घटकांची माहिती सद्दाम बॉम्ब, मेगा बॉम्ब, चौरसा गारलँड, व्हिसलिंग रॉकेट, रॉकेट बॉम्ब, गोल्ड डस्ड आणि विविध प्रकारांतील साखळी फटाक्यांवर रासायनिक घटकांची माहिती लिहिलेली होती.
फटाक्यांचे प्रकार – आवाची निर्मिती (नीचांकी) … (उच्चांकी) डेसिबलमध्ये
सद्दाम बॉम्ब १००.३… १०२.९
जॅकर बॉम्ब ९२.७ …९९.१
महालक्ष्मी मेगा बॉम्ब ९९ …९९.७
चोरसा गारलँड १०४… ११३.६
व्हिसलिंग रॉकेट ९९…८१.९
फ्लॉवर पॉट ६२.६ … ६४
रॉकेट बॉम्ब ६० …७८
डोव्ह थ्री इन वन ७३.१ ….६९
गोल्ड डस्ट ८३ …९७.८
सेव्हन शॉर्ट्स ८५..९३
..
फटाक्यांची माळ
चोवीस फटक्यांची माळ ९७.८… ९९.६
अठ्ठावीस फटाक्यांची माळ ९८……१०१.३
दोन हजारची फटाक्यांची माळ १००.२…११५
एक हजार फटाक्यांची माळ १०१….११२
…
महराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दर वर्षी विविध शहरांमध्ये फटाक्यांच्या मोजणीचा उपक्रम राबवला जातो. या वर्षी आमच्या पथकाने विश्रांतवाडी येथे वेगवेगळ्या फटाक्यांच्या आवाजाची मोजणी केली. दिवाळीत आपण जे फटाके फोडतो, त्या प्रत्येकातून किती आवाजाची निर्मिती होते, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे या उपक्रमाचा उद्देश आहे. नागरिकांनी दिवाळीत प्रदूषणात घट व्हावी, यासाठी सहकार्य करावे.
– नितीन शिंदे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
Recent Comments