गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरात ‘रेमडेसिव्हिर’चा तुटवडा भासू लागला आहे. केमिस्ट संघटनेच्या इंजेक्शन विक्रीदरम्यान झालेली गर्दी, गोंधळ आणि सुरक्षित वावराच्या नियमांचा उडालेला फज्जा यामुळे जिल्हा प्रशासनाने इंजेक्शनची किरकोळ विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही गेल्या दोन ते तीन दिवसांत शहरात इंजेक्शनचा तुटवडा भरून काढण्यात ‘एफडीए’ला पुरेसे यश येऊ शकले नाही. जिल्हा प्रशासनाने ‘एफडीए’च्या माध्यमातून तक्रार नियंत्रण कक्ष सुरू केले. तेथे प्रतिसाद मिळत नसल्याच्याच तक्रारी आहेत.
मंगळवारी शहरात १२ ते १८ हजारांहून अधिक रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी शहरात काल, ३,८९७ एवढ्याच हेटरो कंपनीच्या इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. त्यात बहुतांश रुग्णालयांना साठा मिळाला, तर बुधवारी कंपनीकडून एकाही इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला नसल्याने वितरकांपासून रुग्णालयांचे औषध विक्रेतेही हैराण झाले आहेत. मंगळवारी कमी साठा आणि बुधवारी साठा न आल्याने या छोट्या रुग्णालयांतील रुग्णांच्या नातेवाइकांच्या तोंडचे पाणी पळाले.
अधिकाऱ्यांचा वशिला
पुणे शहरात रेमडेसिव्हिरच्या साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे त्यांच्या धोरणानुसार रुग्णालयांना इंजेक्शनचा साठा थेट पाठवला जात आहे. मात्र, छोट्या रुग्णालयात दाखल केलेल्या ज्या रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही, त्यांचे नातेवाइक अधिकारी किंवा नेत्यामार्फत थेट जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना इंजेक्शनसाठी वशिला लावत आहेत. आयएएस, आय़पीएस वर्गातील अधिकारीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करीत असल्याचे सांगण्यात आले.
‘एफडीए’ची यंत्रणा निष्क्रिय?
रेमडेसिव्हिरच्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांन्वये औषध नियंत्रणाची जबाबदारी ‘एफडीए’कडे आहे. दुसऱ्या लाटेत रेमडेसिव्हिरने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले असताना एफडीएची यंत्रणा काहीच तोडगा काढू शकत नसल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे.
शहरात बुधवारी हेटरो कंपनीसह अन्य कोणत्याही कंपनीच्या इंजेक्शनचा साठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे शहरात तुटवडा निर्माण झाला. कंपनीकडून इंजेक्शन कमी प्रमाणात येत असून, आम्ही सिप्ला कंपनीच्या संपर्कात आहोत.
– एस. व्ही. प्रतापवार, सहायक आय़ुक्त, एफडीए
Recent Comments