नागरिकांची गैरसोय विचारात घेऊन प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या ‘किऑस्क’मार्फत मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य संकल्पनेनुसार महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमधून केंद्रीय पद्धतीने टोकन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था मंगळवारपासून (२० जुलै) कार्यान्वित करण्यात आली आहे.
या पद्धतीनुसार कम्प्युटर प्रणालीद्वारे नागरिकांनी ते राहत असलेल्या ठिकाणी जवळ असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयामध्ये येऊन आपला मोबाइल, जन्माचे वर्ष, प्रथम अथवा द्वितीय लस याबाबतची नोंद करायची आहे. त्यानंतर या मोबाइल क्रमांकावर उपलब्ध होणारा ओटीपी ‘किऑस्क’मध्ये नोंदवून माहिती समाविष्ट करायची आहे. नोंद झाल्यानंतर नागरिकांस छापील टोकन प्राप्त होईल; तसेच टोकन क्रमांक एसएमएसद्वारे नागरिकांस पाठविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
लसीकरणासाठी नोंद झालेनंतर शासनामार्फत उपलब्ध डोस संख्येनुसार केंद्रीय पद्धतीने नागरिकांची निवड करून एसएमएस पाठविला जाईल. त्यानंतर लसीकरण केंद्रांत बोलविण्यात येऊन लसीकरण केले जाईल.
दुसरा डोस मुदत पूर्ण झालेल्यांनाच
ज्या नागरिकांचे कोविशिल्ड लसीकरणासाठी ८४ दिवस व कोव्हॅक्सिन लसीकरणाचे २८ दिवस पूर्ण झाले असतील, तरच नागरिकांना दुसरा डोस देण्यात येईल. या मुदतीची पूर्तता झाली नसल्यास संबंधित केंद्रांवर नागरिकांना डोस नाकारण्यात येईल. नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेशिवाय संबंधित मोबाइल क्रमांक नागरिकांना टोकन घेण्यासाठी वापरण्यात येणार नाही. लसीकरणानंतर हा मोबाइल क्रमांक घरामधील इतर सदस्यांसाठीचे टोकन घेण्यासाठी वापरणे शक्य आहे, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
खात्रीनंतरच लसीकरण
केंद्रीय पद्धतीने लसीकरणासाठी निवड झालेल्या नागरिकांस प्रमाणित करण्यात आलेल्या लसीकरणासाठी जाणे शक्य न झाल्यास संबंधित नागरिकांस पुन्हा नव्याने टोकन घेऊन प्रतीक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट करावे लागेल. लसीकरण केंद्रावरती नागरिकांना एसएमएस अथवा टोकनची प्रत दाखवून खात्री दाखवावी लागेल. त्यानंतरच लस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
किऑस्क पद्धत
– घराजवळील क्षेत्रीय कार्यालय निवडावे
– सोबत स्वतःचा मोबाइल न्यावा.
– मोबाइलवर ओटीपी येईल.
– त्यानंतर नागरिकांना टोकन वाटप
– टोकन क्रमांक एसएमएसद्वारे मिळणार
– टोकनच्या आधारेच लसीकरण होणार
आज ‘कोव्हिशील्ड’ अनुपलब्ध
शहरात ‘कोव्हिशील्ड’ लशीची टंचाई आहे. त्यामुळे बुधवारी (२१ जुलै) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. वय १८ ते ४४ वयोगटातील नागरिक, गर्भवती, स्तनदा माता आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ लशीचा दुसरा डोस उपलब्ध असेल. त्याअंतर्गत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी नवीन जिजामाता रुग्णालय आणि फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन येथे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांना सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी आणि पिंपळे निलख येथील इंगोले शाळा या केंद्रांवर शंभरच्या क्षमतेने डोस उपलब्ध असणार आहेत. आज, बुधवारी ‘कोव्हिशिल्ड’ची लस मिळणार नाही.
करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेता लसीकरण केंद्रावरील सद्यस्थितीतील टोकन पद्धत बंद करण्यात येणार आहे. यापुढे ‘किऑस्क’द्वारे टोकन पद्धत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
– राजेश पाटील, आयुक्त,
पिंपरी-चिंचवड पालिका
Recent Comments